ऑनलाइन मिळालेल्या गुणपत्रिकेवर अकरावीला प्रवेश द्या!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/admission-sp-college-1-1.jpg)
- अकरावी प्रवेश समितीच्या महाविद्यालयांना सूचना : विद्यार्थ्यांना दिलासा
– मूळ गुणपत्रिका दि. 22 जूनला मिळणार असल्याने निर्णय
– बायफोकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू नका
पुणे – अकरावीच्या द्विलक्षी (बायफोकल) विषयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुणपत्रिकेवर शाळा सोडल्याचा दाखला द्यावेत. या गुणपत्रिकेवरूनच विद्यार्थ्यांना अकरावीला मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश देणे आवश्यक आहे, असे आदेश अकरावी प्रवेश समितीने शाळा व महाविद्यालयांना दिले आहेत. मूळ गुणपत्रिका दि. 22 जूनला मिळणार आहेत. त्यापूर्वी बायफोकल विषयाची पहिल्या यादीनुसार प्रवेश होणार आहेत. मूळ गुणपत्रिका (ओरिजनल मार्कलिस्ट) नसल्याच्या कारणावरून बायफोकल विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारू नयेत, असेही समितीने महाविद्यालयांना बजावले आहे.
शाळा सोडल्याचा दाखला आणि महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेत असताना मूळ गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. त्याशिवाय दाखला व प्रवेश दिला जात नाही. मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना बायफोकलची पहिली यादीनुसार प्रवेश पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहेत. त्यामुळे मूळ गुणपत्रिका नसल्याच्या कारणावरून विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, त्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश समितीने महाविद्यालयांना प्रवेश देण्याचे सूचना केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बायफोकल विषयाची प्रवेशप्रक्रिया सर्वात आधी होत आहे. या विषयाचे पसंतीक्रम भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. बायफोकलची पहिली यादी दि. 21 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. ही यादी जाहीर होताच दि. 21 ते 22 जून या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. मात्र त्यासाठी मूळ गुणपत्रिका आवश्यक आहे. परंतु मूळ गुणपत्रिका दि. 22 जून रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर प्राप्त होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये, त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रिकावर शाळांनी शाळा सोडल्याचा दाखला द्यावेत व या गुणपत्रिकेवरूनच कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीला प्रवेश द्यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
82, 721 जणांचे ऑनलाइन अर्ज
पुण्यात अकरावीसाठी 82 हजार 721 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी 74 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्णपणे भरले आहेत. तर 8 हजार विद्यार्थ्यांनी अजून अर्ज अपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे बायफोकल विषयासाठी 59 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यापैकी 4 हजार 861 विद्यार्थ्यानी अर्ज “कन्फर्म’ केला आहे, अशी माहिती अकरावी प्रवेश समितीकडून देण्यात आली.