‘जो भाऊ बायडेन’ अन् ‘कमला अक्का हॅरिस’ या उल्लेखाने पुणेकरांकडून शुभेच्छा
![‘जो भाऊ बायडेन’ अन् ‘कमला अक्का हॅरिस’ या उल्लेखाने पुणेकरांकडून शुभेच्छा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Joe-Biden-Kamala-Harris-Pune-.jpg)
पुणे |महाईन्यूज|
अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन (Joe Biden) यांनी शपथ घेतल्यानंतर पुणेकरांमध्येही उत्साह संचारला. जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) यांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देणारे पोस्टर पुण्यात झळकले आहेत.
अमेरिकीच्या अध्यक्षपदी जो बायडेन आणि उपाध्यक्षपदी कमला हॅरिस यांनी काल शपथ घेतली. त्यांनंतर अमेरिकेत लागले नसतील, पण दोघांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स थेट पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात ‘घासून नाय, तर ठासून आलोय’ असं लिहित पोपटराव खोपडे या पुणेकराने शुभेच्छा दिल्या.
विशेष म्हणजे ‘जो भाऊ बायडेन’ आणि ‘कमला अक्का हॅरिस’ असा गावरान मराठी उल्लेख करत त्यांना पुणेरी पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारतीय वंशाच्या 14 मंत्र्यांची अमेरिकेत निवड झाल्याबद्दलही पोस्टरवर अभिनंदन करण्यात आलं आहे. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत.
याआधी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘डोनाल्ड तात्या ट्रम्प’ असा सोशल मीडियावर भारतीय ट्रोलर्सकडून उल्लेख होत असे. ट्रम्प तात्या अशा नावाने सोशल मीडियावर मीम्स, व्हिडीओही शेअर केले जातात. ट्रम्प यांना मराठी डबिंग करुन भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत.
जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. मेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या समारंभास उपस्थित होते. समारंभाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.