राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून राऊतांचा राज्यपालांवर हल्लाबोल, म्हणाले…
![Shivsena Sanjay Raut criticises Governor Bhagatsingh Koshyari over Governor appointed MLA issue](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Shivsena-Sanjay-Raut-criticises-Governor-Bhagatsingh-Koshyari-over-Governor-appointed-MLA-issue.jpg)
‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. सहा महिने होत आहे पण अजून ही निर्णय घेण्यात आला नाही. घटनात्मकपदावर बसून घटनेची मारेकरी होण्याचे काम तुम्ही करत आहात’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर विखारी टीका केली आहे. संजय राऊत हे नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाशिकचे भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी सेनेत प्रवेश केला. ‘जर तुमच्यावर कुणाचा दबाव असेल तर तसं जाहीर करावे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.
‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या देशाची राज्यघटनेला महत्त्व देत असताना आम्हाला ज्ञान देतात. जर राज्य आणि देश राज्य घटनेनुसार चालावे असं वाटत असेल तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने राज्य घटनेचं पालन केले पाहिजे. राज्य घटनेनं जे अधिकार दिले आहे, त्यानुसार, राज्य कॅबिनेटने जे निर्णय दिले आहे, ते निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असतात’ असं राऊत यांनी राज्यपालांना ठणकावून सांगितले.
‘जर 12 आमदारांच्या जागांबद्दल जून महिन्यांत निवडणुका होणे अपेक्षित होते. त्यानंतर राज्य सरकारने प्रस्ताव देखील पाठवला आहे. सहा महिने होत आहे अजून ही निर्णय घेण्यात आला नाही. घटनात्मकपदावर बसून घटनेची मारेकरी होण्याचे काम तुम्ही करत आहात. एखाद्या विषयाचा अभ्यास करायला किती वेळ लागतो. हे सरकार पाडले जात नाही, माझ्या मनासारखे सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर सह्या करणार नाही. असा जर आदेश किंवा सुचना आल्या असेल तर राज्यपालांनी स्पष्ट करावे, मग त्यानुसार आम्ही लढाई लढू’ असा इशाराही राऊत यांनी दिला.