मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण; शेलारांची जोरदार टीका
![BJP Ashish Shelar criticises Shivsena over Gujrati tagline for upcoming BMC election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Ashish-Shelar-Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई – शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ‘दिवसेंदिवस शिवसेनेचा पायाखालचा मतदारवर्ग घसरत चालल्याने कृत्रिम वलय तयार केलं जात आहे. शिवसेनेने आत्मविश्वास गमावला, म्हणून त्यांना खमंग ढोकळा आठवला’, अशी खरमरीत टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,50,171 वर
‘महाविकास आघाडीतील एकही पक्ष आमच्याशी एकटं लढू शकत नाही, हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आमची रणनीती ही विजयनीती असेल. पक्षाचे 12 प्रमुख नेते ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी फिरणार आणि महाविकास आघाडीला जागा दाखवून देणार’, असा इशाराही शेलारांनी दिला. तसेच ‘रोज सरकार पडणार म्हणून ओरडायचे आणि फोडाफोडी करायची, हे दुबळ्यांचे राजकारण आहे. नवी मुंबईत भाजपचा विजय निश्चित आहे’, असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी शिवसेनेनेही पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेने मुंबईसह राज्यातील गुजराती मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’, असे म्हणत शिवसेनेने मुंबईतल्या गुजराती बांधवांना साद घातली आहे. तसेच गुजराती बांधवांसाठी शिवसेनेच्यावतीने येत्या १० तारखेला जोगेश्वरीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.