अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील: मराठा क्रांती मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Maratha-Kranti-Morcha2-e.jpg)
सांगली: पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल, मुके मोर्चे बोलके होतील, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला.
सांगलीत काल पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा इशारा देण्यात आला. यावेळी आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय भीमा कोरेगाव दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
सांगली -मिरज रोडवरील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात काल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीसाठी विविध जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांनी आज हजेरी लावली होती. राज्य सरकारने मराठा समाजाच्या महामोर्चानंतर शैक्षणिक सवलत वगळता इतर एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. अन्य आश्वासन पूर्तता होईल, असे पाऊल अद्याप उचलले गेले नाही. त्यामुळे समाजात सरकारविरुद्ध असंतोष खदखदतोय. आणि तो सरकारला दाखवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी केली पाहिजे, असे मत यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि नेत्यांनी व्यक्त केला.