मनपाच्या व्यायामशाळेत महिलांसाठी राखीव वेळ
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळेत सकाळी एक आणि सायंकाळी एक तास महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिलांना रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सकाळी आणि दुपारी पालिकेच्या व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी प्रवेश मिळणार आहे.
शहरात महापालिकेच्या एकूण 82 व्यायाम शाळा आहेत. 32 व्यायामशाळा पालिका चालविते तर 50 व्यायाम शाळा खासगी संस्था चालवितात. मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महिला व नागरिक घराबाहेर पडले नाहीत. राज्य सरकारने व्यायामशाळा चालविण्यास बंदी घातली होती. आता कोरोनाच्या विषाणुजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढणे गरजेचे आहे. विशेषतः महिलांना व्यायामाची खूप गरज आहे. ही बाब मनपा प्रशासनाने मनावर घेतली आहे.
यासाठी महापालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या व्यायामशाळेत महिलांना सकाळी एक तास आणि दुपारी एक तास वेळ राखीव ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे. त्याची दखल घेऊन क्रिडा विभागाने मनपा चालवत असलेल्या व्यायाम शाळेत सकाळी 9 ते 10 आणि दुपारी 4 ते 5 ही वेळ महिलांसाठी राखीव ठेवली आहे. तर, मनपाच्याच परंतु, खासगी संस्था चालवत असलेल्या व्यायाम शाळेत सकाळी 10 ते 11 आणि दुपारी 3 ते 4 या वेळेत महिलांना व्यायाम करण्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी व्यायाम शाळेतील सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन क्रिडा विभागाने केले आहे.





