गडचिरोली जिल्ह्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी गुणसंवर्धीत तांदूळ वितरीत करणार
![Distribute quality rice to reduce anemia in Gadchiroli district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Anemia.jpg)
मुंबई | प्रतीनिधी
राज्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी “सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरीत करण्याची योजना संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी सद्यस्थितीत लोहयुक्त गोळ्या देणे इत्यादी पर्यायाने सरकारमार्फत ॲनिमिया नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्याला आणखी काही वेगळया पुरवठा व्यवस्थेची आवश्यकता आहे.
त्यासाठी अन्नधान्यात पोषण तत्व मिसळून गुणसंवर्धीत अन्नधान्य उपलब्ध करणे या पर्यायाच्या अनुषंगाने देशात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनातर्फे 2018-19 मध्ये “सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत” राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा व भामरागड या तालुक्यांमध्ये “पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ वितरीत करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेला होता. राज्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आता संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात “सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ वितरीत करणे” ही योजना पुढील वर्षापर्यंत राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याने प्रायोगिक तत्वावर राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.