बी.एड, एम.एडच्या प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ
पुणे – शिक्षक, प्राध्यापक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून बी.एड आणि एम.एड अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची तारीख सीईटी सेलकडून वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार बी.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आता शुक्रवारपर्यंत आणि एम.एडला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी बुधवारपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. सीईटी सेलकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे राज्यभरात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. तर मोजक्याच शाळांमध्ये 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहेत. अशा स्थितीत बी.एड आणि एम.एडच्या प्रवेश प्रक्रियेत मिळालेली मुदतवाढ विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे.