कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीवर बलात्काराचा आरोप, टीव्ही अभिनेत्रीने पोलिसांत केली तक्रार

मुंबई – एका टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले.
अभिनेत्रीचे म्हणणे नोंदवून ७२ तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पोलिसांनी या प्रकरणात अभिषेक तिवारीला अटक केलेली नाही. लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर अभिषेक तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. साधारणपणे महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून २४ तासांच्या आत चौकशीसाठी बोलावले जाते आणि आवश्यकता भासल्यास अटक केली जाते. अभिनेत्रीच्या आरोपांप्रकरणी तपास सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीशी संबंधित बेकायदा घडामोडींसाठी मुंबई वारंवार चर्चेत येत आहेत. याआधी २३ नोव्हेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे.





