खळबळजनक : बारामतीत विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या
बारामती / महाईन्यूज
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत एका वयोवृध्द व्यक्तीने विठ्ठल मंदिराच्या गाभा-यात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही.
वनवे मळा परिसरातील विठ्ठल मंदिरात शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. काशीनाथ उर्फ नाना वनवे (वय 60) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. काशीनाथ वनवे हे माळकरी सांप्रदायिक असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील वनवे मळा येथे शनिवारी काशिनाथ सीताराम वनवे यांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात गळफास घेतला. काशिनाथ वनवे यांचं स्वतःचं विठ्ठल मंदिर होतं. ते नेहमीप्रमाणे सकाळी आणि सायंकाळी मंदिरात पूजाअर्चा करायचे. परंतु, सायंकाळी त्यांनी याच मंदिराच्या गाभा-यात गळफास घेतला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. काशिनाथ वनवे यांच्या आत्महत्या करण्यामागील कारण आद्याप समजलं नाही. पोलिसांनी काशिनाथ वनवे यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला असून पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे.