मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ७५३ फेऱ्यांची वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/local-1.jpg)
मुंबई – महिलांना प्रवासाची मुभा दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळावे याकरता मध्य आणि पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून ७५३ लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रविवारी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती.
१ नोव्हेंबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ६१० फेऱ्या वाढविण्याचा निर्णय ३१ ऑक्टोबर रोजी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी घेतला होता. त्यानंतर आणखी ७५३ फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे पियूष गोयल यांनी जाहीर केले. या ७५३ फेऱ्यांमुळे आता मुंबई लोकलवरील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण २७७३ फेऱ्या होणार आहेत. दरम्यान, वाढविण्यात आलेल्या ७५३ फेऱ्यांमध्ये मध्य रेल्वेच्या ५५२ तर पश्चिम रेल्वेच्या २०१ फेऱ्यांचा समावेश आहे.