सोलापूर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची (ग्रामीण) संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त
सोलापूर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (ग्रामीण)ची सद्यस्थितीत असणारी संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त केली असून दिवाळीपूर्वी नवीन कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष शहाजी मुळे उपस्थित होते. राष्ट्रवादी घराघरात पोहचवून संघटन मजबूत करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम चालू केले आहे. नव्या जुन्याची सांगड घालून व सर्व युवकांना बरोबर घेऊन तसेच सर्व ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन घेऊन सोलापूर जिल्ह्यात मागील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची चळवळ ज्या पद्धतीने सुरू होती, त्याच पध्दतीने सोलापूर जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय करण्याची महत्वाकांक्षा बाळगून आम्ही दौरे सुरू केले आहेत.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची (ग्रामीण), तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यासंदर्भात परिपत्रक काढले असून दिवाळीपूर्वी नवीन कार्यकारिणी स्थापन करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जेष्ठांच्या मार्गदर्शनाने जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून पक्ष अधिक बळकट करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.