राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,54,028 वर
![The number of corona victims in the state is 25,64,881](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1800x1200_coronavirus_1.jpg)
- मुंबईत 801, पुण्यात 549 नवे रुग्ण
मुंबई – राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी महाराष्ट्रात 3 हजार 645 रुग्ण आढळले होते. तर काल राज्यात कोरोनाच्या 5 हजार 363 नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच कोरोनातून बऱ्या झालेल्या 7 हजार 836 रुग्णांना घरी सोडण्यात आले. याशिवाय दिवसभरात 115 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 16 लाख 54 हजार 028 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 43 हजार 463 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 14 लाख 78 हजार 496 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 1 लाख 31 हजार 544 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 801 नवे रुग्ण आढळले, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 52 हजार 888 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10 हजार 122 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 2 लाख 22 हजार 501 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 19 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 34 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 20 हजार 661 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 767 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 549 रुग्णांपैकी 241 रुग्ण हे पुणे शहरातील असून 127 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 60 हजार 086 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 87 हजार 051 इतकी झाली आहे.