महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी, विलोभनिय रुप पाहण्याची ऑनलाईन संधी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Mahalaxmi-pune.jpg)
पुणे – दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला दस-याच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाकडून 16 किलो वजनाची सोन्याची साडी नेसविली आहे. कोरोनामुळे मंदिरं बंद असले तरी सोन्याची साडीतील देवीच्या मनोहारी रुपाचे दर्शन भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घेतले. दरवर्षी दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविली जाते.
‘दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या या साडीतील देवीचे मनोहारी रुप पाहण्याकरीता दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा मंदिर बंद असल्याने शेकडो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने देवीचे दर्शन घेतले. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात आला, अशी माहिती मंदिराचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.
देविला नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज सुमारे 2000 ते 2500 फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. दररोज वेगवेगळ्या फळांच्या नैवेद्याचा प्रसाद पुण्यातील विविध कोविड सेंटर्सना पाठविण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून संपूर्ण उत्सवात सुमारे 20 हजार फळे कोविड सेंटर्समधील रुग्ण व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच विविध प्रकारचे यज्ञ-याग, पीएमपी कर्मचा-यांना पीपीई किट आणि कोरोना योद्ध्यांच्या हस्ते पूजन असे नानाविध कार्यक्रम देखील उत्सवात करण्यात आले.