राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात पुन्हा खलबते
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/sharad-pawar-rahul-gandhi-6.jpg)
- बहुभुजाधारी महाआघाडी नवी
दिल्ली – केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या कामकाजाचा उदोउदो करण्यात भाजपची मंडळी व्यस्त असतानाच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाखालची चादर ओढण्यासाठी महाआघाडीची अभेद्य इमारत बनविण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
कॉंग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि कार्यक्रम नसताना शरद पवार फक्त एका दिवसासाठी दिल्लीला आलेत. कॉंग्रेस अध्यक्षांनी 6 जनपथ या निवासस्थानी जाउन पवार यांची भेट घेतली, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा अधिकृत तपशील कळू शकला नसला तरी वर्तमान राजकीय परिस्थिती आणि 2019 च्या निवडणुकीत सशक्त महाआघाडी बनविण्याच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याचे समजते. आगामी काळात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. या राज्यांमध्ये बळकट क्षेत्रीय पक्षांशी आघाडी करून भाजपला तगडे आव्हान देण्याचा सल्ला सुध्दा पवार यांनी राहुल गांधी यांना दिला असल्याचे समजते.
बळकट महाआघाडी बनविण्याची राहुल गांधी यांची तळमळ 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठीच आहे. यासाठी क्षेत्रीय पक्षांना कसे सोबत घ्यायचे? यावर पवार यांच्याकडून सल्ला घेण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत. पवार यांच्या सांगण्यावरून राहुल गांधी लवकरच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांची भेट घेणार आहेत.
कॉंग्रेसच्या हातून एकामागून एक राज्ये निसटत असली तरी गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगाना यासारख्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची स्थिती चांगली आहे. अशातच, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या निवडणुकीत कॉंग्रेसने चांगले प्रदर्शन केले तर याचा फायदा 2019 मध्ये आपोआप मिळेल. कॉंग्रेस पुन्हा मुख्य प्रवाहात येईल आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व सुध्दा मान्यता पावेल. यामुळे या राज्यांमध्ये लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही पवार यांनी दिला असल्याचे समजते.