अफगाणिस्तानमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोटात 12 ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/12-killled-6.jpg)
काबुल – काबुलमध्ये ग्रामीण पुनर्वसन आणि विकास मंत्रालयाच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 12 जण ठार आणि 31 जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहीद मजरोह यांनी या स्फोटाबाबत अधिक माहिती दिली. इस्लामिक स्टेटने या आत्मघातकी बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. अफगाणिस्तान सरकारने रमजानच्या अखेरच्या आठवड्यात तालिबानबरोबर एकतर्फी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. ही शस्त्रसंधी उद्यापासून सुरू होणे अपेक्षित असतानाच हा बॉम्बस्फोट झाला आहे.
रमजान महिन्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी कामावरून लवकर बाहेर पडत असताना हा स्फोट झाला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मंत्रालयातील कर्मचारी मंत्रालयाच्या इमारतीबाहेर बसची वाट बघत थांबलेले असताना हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला.
दुसरीकडे अफगाणिस्तानच्या नानगार प्रांतातील जलालाबाद शहरामध्ये दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयांवर हल्लाही चढवला. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींनी इमारतीच्या गच्चीवरून उड्याही मारल्या. शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर आणखी एक आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये किमान 10 जण जखमी झाले. काबुलमध्ये एका घरामध्ये झालेल्या एका स्फोटात आणखी एक व्यक्ती मरण पावला आणि अन्य तिघेजण जखमी झाले. या घरामध्ये आत्मघातकी जॅकेट आणि अन्य स्फोटकांचा साठा आढळून आला आहे.