केंद्र सरकारकडून उत्सव योजना जाहीर, केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सवांसाठी मिळणार 10 हजार रुपये ऍडव्हान्स
![The Televox](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/nirmala-sitaraman-news_2017099493.jpg)
नवी दिल्ली – अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यात केंद्र सरकारनं चार योजना जाहीर केल्या असून, उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये अॅडव्हान्स देण्याची घोषणा केली आहे.
अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी वस्तूंना मागणी वाढणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं केंद्र सरकारनं महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. केंद्र सरकारनं खरेदीशक्ती वाढवण्यासाठी चार पावलं उचलली आहेत. यात पहिलं पाऊल म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एलटीसीच्या ऐवजी कॅश व्हाऊचर्स दिली जाणार आहेत. दुसरी गोष्ट कर्मचाऱ्यांना सण उत्सवांसाठी १० हजार रुपये अॅडव्हान्स दिले जाणार आहेत. त्याचबरोबर राज्यांना ५० वर्षांपर्यंत १२ हजार कोटींचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार. अर्थसंकल्पातील खर्चाव्यतिरिक्त पायाभूत विकासावर २५ हजार कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे.