माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर कोरोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/ARJUN-KHOTKAR.jpg)
जालना – मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील कोरोनाचा कहर प्रचंड वाढत आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेकजण आले असून रविवारी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. खोतकर यांनी स्वतः फेसबुकवरून याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील ब्रीच कँंडी रुग्णालयात उपचार घेणार असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले आहे.
‘अखेर कोविडने गाठलेच. लोक संकटात असताना नेतृत्त्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँंडी रुग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेन. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपापली टेस्ट करून घ्यावी. घरीच राहा, सुरक्षित राहा. शासनाच्या निर्देशांचे सर्वांनी पालन करावे व सुरक्षित राहावे’, असे खोतकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
![](http://enavakal.com/wp-content/uploads/2020/09/Capture-30.jpg)
दरम्यान, नाशिकमधील भाजपाच्या धडाडीच्या नेत्या प्रा. देवयानी फरांदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी शनिवारी केलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदार फरांदे यांनी मराठा समन्वय बैठकीला हजेरी लावली होती. यामुळे आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन देवयानी फरांदे यांनी केले आहे.