हिमाचल प्रदेशात ५ महिन्यांनंतर शक्तीपीठ मंदिरे दर्शनासाठी खुली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/SHIKARI_DEVI-himachal-pradesh.jpg)
धर्मशाळा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ५ महिन्यापासून बंद असलेली हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ मंदिरे खुली करण्यांत आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भाविकांची उपस्थिती फारच कमी होती. श्री ज्वालामुखी, श्री चिंतपूर्णि, श्री नयना देवी आणि श्री बज्रेश्वरी देवी अशी चार शक्तीपीठ मंदिरे प्रशासनाने आखून दिलेले सर्व नियम पाळत खुली करण्यात आली होती.
बज्रेश्वरी देवी मंदिरात मंदिर सहाय्यक आयुक्त तथा एसडीएम कांगडा अभिषेक वर्मा यांच्या हस्ते विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मंदिर भाविकांसाठी खोलण्यात आले. मंदिरातील मुख्य ज्योतिपासून २०फूट अंतरावरून दर्शन दिले जात होते. तर श्री ज्वालामुखी शक्तीपीठ मंदिरात दर्शनाआधी भाविकांची नावे नोंदवली जात होती. बैजनाथ आणि महाकाल मंदिर दुपारनंतर खुले करण्यात आले.
सर्व मंदिरामध्ये ६५ वर्षावरील ज्येष्ठ व्यक्ती, १० वर्षाखालील मुले आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. प्रत्येक भाविकाला तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मंदिरात घंटा वाजविण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच पुजाऱ्याला भाविकांना प्रसाद आणि तीर्थ देण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.