ईपीएफच्या खात्यावर आता 7 लाखांचा विमा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/epfo-6-x419.jpg)
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या खात्यावर आता 7 लाखांपर्यंत विमा मिळणार आहे. कर्मचाऱ्याचा अपघाती, आजारपणात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला एकरकमी भरपाई दिली जाणार आहे. बुधवारी कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी आणि ईपीएफची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
एम्प्लॉइज डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम, 1976 च्या तरतुदीन्वये कंपनी आणि केंद्र सरकारद्वारे नोकरदारांना विम्याचा लाभ दिला जात आहे. सुरुवातीला या विम्याची मर्यादा 3.60 लाखांपर्यंत होती. सप्टेंबर 2015 मध्ये ती 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यात आता एक लाखाची वाढ केली आहे. कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 12 टक्के हिस्सा पीएफमध्ये जमा करावा लागतो, तर तितकेच योगदान कंपनीचे असते. विमा योजनेत मात्र पूर्णपणे प्रिमियम कंपनीलाच भरावा लागणार आहे. केंद्राच्या निर्णयाने ईपीएफओ खातेदारांना दिलासा मिळाला आहे.
कोणाला मिळणार लाभ?
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या सर्व ग्राहकांना विम्याचा लाभ मिळणार आहे. नोकरीत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना म्हणजेच परिवाराला ही विमा भरपाई दिली जाणार आहे.