#CoronaVirus: नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Navi-Mumbai-Corona.jpg)
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या 33 विभागांना कंटेंटमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. परंतु कंटेन्मेंट झोन घोषित करुनसुद्धा या ठिकाणी नागरिक सर्रासपणे घराबाहेर पडून महापालिकेच्या कोणत्याही नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पोलिसांची मदत घेऊन कंटेन्मेंट झोन असलेल्या विभागात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केलेली आहे.
नवी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 29 हजारांवर येऊन पोहचला आहे. नवी मुंबईतील 33 विभागांना पालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता 30 सप्टेंबर पर्यंत नवी मुंबईत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये कंट्रोल मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या भागात ये-जा करण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना थोडा त्रास होईल. पण, या कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन सुरुच राहणार आहे. तसेच, या भागातील दुकाने बंद राहणार आहेत, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.