कोरोना संसर्गानंतर कोल्हापूरचे माजी खासदार राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Raju-Shetti-1-.jpg)
इचलकरंजी – कोल्हापूरचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
राजू शेट्टी यांचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांनी शेट्टी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राजू शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून दूध दर आंदोलन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी झाली, तेव्हा अहवाल निगेटिव्ह आला होता, परंतु एचआरसीटी टेस्टमधून त्यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर शेट्टी यांच्यासह पत्नी आणि सुपुत्र सौरभही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरुवातीला त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती देत संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.