राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांचा रोज नवा उच्चांक; अनेक तालुक्यात, गावात उत्स्फूर्त जनता कर्फ्यू
![Worrying! 49,447 in the state and 9090 in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow.jpg)
मुंबई | गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा राज्यात रोज नवा उच्चाक स्थापित होत आहे. प्रत्येक दिवशी नवीन रुग्णांची संख्या हजारोंच्या पटीने वाढतच आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मृतांचा आकडा वाढला आहे. सध्या उपलब्ध परिस्थितीत, आहे त्या साधनसामुग्रीत आरोग्य व्यवस्था काम करत आहे. मात्र, रुग्णसंख्याच इतकी झपाट्याने वाढत आहे की त्या व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे राज्यात अनेक तालुक्यात जनता कर्फ्यू घेण्यात येत आहेत.
राज्यात रविवारी रुग्णवाढीचा नवा विक्रम नोंदविण्यात आला. एका दिवसात 23,350 रुग्णांची नोंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विभागातर्फे देशातील 35 जिल्ह्यांना कोरोना व्यवस्थापनाच्या अनुषंगाने काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या 35 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे, चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारावरून महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे.
काही महिन्याअगोदर ग्रीन झोनमध्ये असलेला वाशीम जिल्ह्यामध्ये 2163 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या रिसोड शहर परिसरात आढळत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून व्यापारी मंडळाने रिसोड शहरात 4 दिवस जनता कर्फ्यू घोषित केला होता. आज रिसोड शहर बंदचा तिसरा दिवस आहे, तर जनता कर्फ्यू संपल्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दुकान सुरु राहणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्याने घेतला आहे.