बिलाचे पैसे नसल्याने दाम्पत्याला अर्भक विकायला लावलं ;आरोग्य विभागाने रुग्णालय सील केले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/0arbhak.jpg)
उत्तर प्रदेशातील आग्रा इथे आरोग्य विभागाने जेपी रुग्णालयावर छापेमारी करत ते सील केलं आहे. या रुग्णालयाने बिलाची रक्कम चुकती करण्यासाठी पैसे नसल्याने एका दाम्पत्याला त्यांच्या नवजात बाळाला विकण्यास भाग पाडलं होतं असा आरोप केला जात आहे. हे बाळ या दाम्पत्याने 1 लाख रुपयांना विकलं होतं. छापेमारीदरम्यान आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयात एकही डॉक्टर, किंवा निमवैद्यकीय कर्मचारी दिसून आला नाही. इथे कोणत्याही रुग्णावर उपचारही सुरू नव्हते आणि जे कर्मचारी होते ते समाधानकारक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते सील केलं आहे. या रुग्णालयाच्या दारावर नोटीस चिकटवण्यात आली आहे.
रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसांच्या आत मुख्यमंत्री कार्यालयात हजर राहून त्यांचे निवेदन सादर करावे अशी सूचना या नोटीसद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणाची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीही सुरू करण्यात आली आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी आरसी पांडे यांनी या रुग्णालयावरील छापेमारीबाबत बोलताना सांगितले की रुग्णालयात अनेक गोष्टींचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाच्या नोंदणीची सगळी कागदपत्रे तपासली जाणार असल्याचेही पांडे म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून अतिरिक्त महानगर दंडाधिकारी विमल किशोर गुप्ता आणि पोलीस उपअधीक्षक विकास कुमार यांनी बाळाची विक्री करणाऱ्या दलित दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी बाळाच्या आईने तिचं बाळ परत मिळवून द्या असं म्हणत या सरकारी अधिकाऱ्यांना विनवणी केली. बाळाची आई बबिता हिची 24 ऑगस्टला प्रसुती करण्यात आल्यानंतर उपचारांचे 30 हजार आणि औषधांचे 5 हजार रुपये रुग्णालयाने बिल केले होते. बबिताचा नवरा हा रिक्षा ओढण्याचे काम करतो. हे बिल भरायची ऐपत नसल्याने त्याच्यापुढे पैसे कसे आणायचे हा प्रश्न उभा राहिला होता.
रुग्णालयाने या दाम्पत्याकडून काही कागदपत्रांवर अंगठे लावून घेतले आणि त्यांना एक लाख रुपये देत बाहेर काढलं. त्यांचं बाळ रुग्णालयाने आपल्याकडेच ठेवून घेतलं होतं. रुग्णालयाने मात्र त्यावेळी आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. या दाम्पत्याने आपल्या मर्जीने बाळ विकल्याचं रुग्णालयाच्या व्यवस्थापिका सीमा गुप्ता यांनी म्हटले होते. आपल्याकडे दाम्पत्याने बाळाच्या विक्रीला होकार देणारी कागदपत्रे असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.