वनातील जलव्याप्त क्षेत्रात भरीव वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/jalyukt-shivar-6.jpg)
- वन विभागाने केलेल्या जलयुक्त वन कार्यक्रमाला यश
मुंबई – वन विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आल्याने वनातील जलव्याप्त क्षेत्रात 432 चौ.कि.मी.ची भरीव वाढ झाली आहे. तसेच याची नोंद भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2017 मध्ये देखील घेण्यात आली आहे.
2015च्या भारतीय वन स्थिती अहवालात एकूण जलव्याप्त क्षेत्र 1116 चौ. कि.मी. होते. ते 2017 मध्ये वाढून 1548 चौ.कि.मी. इतके झाले आहे. जलव्याप्त क्षेत्रातील ही वाढ 432 चौ कि.मी. इतकी आहे. जलयुक्त शिवार, जलसंधारणाच्या हाती घेतलेल्या कामांमुळे ही वाढ शक्य झाली आहे. वनयुक्त शिवार करताना जलयुक्त वन कार्यक्रमास वन विभागाने गती दिली आहे त्याचे हे फलित असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
2014-15 ते 2016-17 या मागील तीन वर्षात विभागाने 33 हजार 747 कामे मंजूर केल्याचे व त्यापैकी 28 हजार 741 कामे पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली. पावसाचे पाणी जास्तीत जास्त अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे, लोकसहभागातून जलस्त्रोताचा पाणीसाठा वाढविणे, लोकांमध्ये पाणी वापराबद्दलची जनजागृती करणे असे अनेक आयाम नजरेसमोर ठेवून राज्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात येत आहेत.
वन विभागही यात मागे नाही. वन विभागाने आतापर्यंत नालाबांध, वन तलाव, सीसीटी बांध, गॅबियन बंधारे, खोदतळे, सिमेंट बंधारे, ल्युज बोल्डर स्ट्रक्चर, जल शोषक खड्डे यासारखी कामे जलयुक्त शिवार कार्यक्रमातून घेतली आहेत. वन विभागाने 2014-15 मध्ये 5 हजार 201 कामे मंजूर केली होती त्यापैकी 4 हजार 376 कामे पूर्ण झाली आहेत. यावर साधारणत: 75 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
वन विभागाने जलयुक्त शिवार कार्यक्रमात पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कामे केल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत सलग दोनदा विभागाच्या अभिनंदनाचा ठराव पारित झाला आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर
2015-16 मध्ये विभागाने 14 हजार 635 कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी 12 हजार 765 कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी साधारणत: 202 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 2016-17 साली विभागाने 13 हजार 911 कामे मंजूर केली होती त्यापैकी 11 हजार 600 कामे पूर्ण झाली आहेत. यावर अंदाजे 192 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.