एसटीने गडचिरोलीत येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक
![# Covid-19: 21,821 new corona infections diagnosed in 24 hours in India, 299 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-3.jpg)
गडचिरोली – जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या बसने दुसऱ्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जारी केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे नातेवाईकांना भेटण्याची उत्सुकता शिगेला असलेल्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.
लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य सरकारने आंतरजिल्हा वाहतुकीला नुकतीच परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांचीच संख्या अधिक आहे. कोणत्याही अटीशिवाय दुसऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश दिल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून एसटीने प्रवास करणाऱ्याला 14 दिवस होम क्वारंटाईन करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे.
या अधिसूचनेत म्हटले आहे की, सद्यस्थितीत जवळपासच्या जिल्ह्यांमध्येच बसफेऱ्या सुरू कराव्यात. लांब पल्ल्याच्या बसेस पुढील आदेशापर्यंत सुरू करता येणार नाहीत. बसमध्ये केवळ 22 प्रवाशांनाच प्रवेश दिला जाईल. बसमध्ये सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे. प्रवाशाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधल्याशिवाय एसटीत प्रवेश देऊ नये. दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. या प्रवाशांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. तर रेडझोन आणि हॉटस्पॉटमधून येणाऱ्या प्रवाशाला संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. संबंधित प्रवासी खरंच क्वारंटाईन आहेत का याची खातरजमा तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.