पक्षाच्या भूमिकेविषयी नितीशकुमार यांचे मौन
पाटणा – संयुक्त जनता दलाच्या म्हणजेच जेडीयु पक्षाच्या कोअर कमिटीची काल बैठक झाली. त्यात लोकसभा निवडणुकीत बिहार मध्ये नितीशकुमार हेच एनडीएचा चेहरा असतील मोदी नव्हे, अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्याविषयी आज पत्रकारांनी छेडले असता त्या विषयी कोणतेच भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
जेडीयु आणि भाजप यांच्या आघाडीचे सरकार बिहार मध्ये सत्तेवर आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशिलकुमार मोदी यांनी जेडीयुच्या या भुमिकेवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की नितीशकुमार हे जेडीयुचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच नितीशकुमार हेही एनडीएचे बिहार निवडणुकीतील चेहरा असतील.
नितीशकुमार यांना या विषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे मी सगळ्यांच्या चेहेऱ्यावर हास्य पाहू इच्छितो. त्यामुळे अन्य चेहेऱ्यांविषयी मला काही विचारू नका असे म्हणत नितीशकुमार यांनी पत्रकारांना या विषयी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.