१२ ऑगस्टपासून नागपुरात ‘वंचित’चे ‘लॉक हटाव, देश बचाव’ आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Prakash-Ambedkar1.jpg)
नवी मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मागील २ वर्षातील, मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यातील राज्यातील मृत्यूचे आकडे सोशल मीडियावर जाहीर करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. गेल्या १५ दिवसापासून राज्यातील लॉकडाऊन मागे घेण्यात यावे असे आवाहन करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता वेळीच निर्णय न घेतल्यास नागपुरात १२ ऑगस्ट रोजी डमरू वाजवत ‘लॉकडाऊन हटाव, देश बचाव’ आंदोलन छेडले जाणार आहे, ही माहिती वंचित बहुजन आघाडीचे भास्कर भोजने यांनी दिली आहे.
सरकार लोकांना भीती दाखवून घरात बसवून हुकूमशाही राबवत आहे, त्याचा लोकच आता धिक्कार करत आहेत. लॉकडाऊनच्या माध्यमातून ५ टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांवर अन्याय करू नका, लोक उपाशी मरतील, सर्व व्यवहार सुरू करा असे प्रकाश आंबेडकर हे वारंवार सरकारला सांगत आहेत. खरे तर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत. यावर्षी तीन महिन्यांत तब्बल ४९०९९ इतके कमी मृत्यू झाले असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्याचे भास्कर भोजने यांनी म्हटले आहे.