कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे – अजित पवार
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. योग्य नियोजन करुन मुंबईतील कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविले आहे. तसेच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड सह राज्यातील इतर ठिकाणीही युध्द पातळीवर काम सुरु करण्यात आले आहे. सरकारच्या या कामात ‘राजमुद्रा ग्रुप’ आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवार’ सारख्या इतर सामाजिक संस्थांनी देखील पुढे यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शुक्रवारी (दि. 7 ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार हे कै. आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात येणा-या जम्बो फॅसिलीटी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी ‘राजमुद्रा ग्रुप’ आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवार’ यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी अजित पवार यांच्या हस्ते 45 ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा वीस हजार पेक्षा जास्त असला तरी साडे सतरा हजारांहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आगामी काळात आणखी रुग्ण संख्या वाढण्याचा धोका विचारात घेऊन कै. आण्णासाहेब नगर स्टेडियम, अॅटो क्लस्टर व बालनगरी येथे जम्बो फॅसिलीटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार महापालिका काम करीत आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोविडसाठी समर्पित करण्यात आले आहे. या रुग्णालयास माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी 45 ऑक्सिजन सिलेंडर भेट दिले आहे. हा उपक्रम प्रशंसनिय आहे. असेच इतर सामाजिक संस्थांनी देखील पुढे येऊन काम करावे असेही अजित पवार म्हणाले.
तत्पुर्वी, ‘राजमुद्रा ग्रुप’ आणि ‘राजू मिसाळ मित्र परिवारच्या’ वतीने सकाळी दुर्गा देवी टेकडी येथे अत्यावश्यक सेवेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते ट्रॉली स्ट्रेचर व फोल्डींग स्ट्रेचर भेट देण्यात आली. यावेळी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ, सुप्रभात मित्र परिवारचे अध्यक्ष अंकुश बंडगर, पक्षीमित्र चंद्रकांत देसाई, वृक्षमित्र बळवंत पडवळ, कृष्णा साळवी, सुनिल हेमाणे, निंबा चौधरी, रविंद्र मोहिते, बाबासाहेब नायकवडी, विनायक पेणकर, शेखर पुजारा, केरु राऊत, विलास कु-हाडे, ज्ञानेश्वर पाठक, अनिल आढाव, बापू मोहिते, नारायण बुरुमकर आदी उपस्थित होते.