पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम अन् प्रभातफेरीद्वारे जनजागृती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/WhatsApp-Image-2018-06-05-at-2.59.34-PM.jpeg)
- महापालिकेसह विविध संघटनांचा सहभाग
- सीआरपीएफच्या जवानांनी देखील केले स्वच्छतेचे काम
पिंपरी – महापालिकेमध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, मोठया प्रमाणात कचरा निर्माण होणा-या ठिकाणी जागेवरच ओल्या कच-यापासून खतनिर्मिती करणे व प्लास्टीक बंदी, जलपर्णी काढणे, प्रभातफेरी आदी कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत सीआरपीएफच्या जवानांनी देखील सहभाग घेतला.
अ क्षेत्रीय कार्यालयातील भेळ चौक, संत तुकाराम उदयान मार्गे सिटी प्राईड स्कुल आकुर्डीपर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. महापालिका अधिकारी, कर्मचारी, पर्यावरण संवर्धन समिती, आंघोळीची गोळी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य या प्रभातफेरीत सहभागी झाले. सीटी प्राईड शाळेमध्ये स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पर्यावरणाचे महत्व यावर मार्गदर्शन केले. अ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षा अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, अमित गावडे, क्षेत्रीय अधिकारी मंगेश चितळे, सहा. आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे आदी उपस्थित होते. अ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आकुर्डी भाजी मंडई येथील खंडेराय भाजी मंडई येथे प्लास्टीक मुक्ती मोहिम राबविली. कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालयातर्फे गणपती विसर्जन घाट, बिर्ला हॉस्पिटल रोड, चिंचवड, वार्ड क्रं १८ ब प्रभाग येथे स्वच्छता मोहीम घेतली. मोहिमेत आरोग्य निरीक्षक व आरोग्य मुकादम सह ११ कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेअंतर्गत ५०० किलो कचरा गोळा करण्यात आला. चिंचवड भाजी मंडई, चिंचवड, वार्ड क्रं १८, ब प्रभाग येथे भाजी विक्रेते व नागरिक यांना प्लास्टिक पिशवी न वापरण्याबद्दल प्रबोधन केले. क क्षेत्रीय कार्यालयामध्ये केंद्रीय विहार से.नं. ४ येथे कचरा विलगीकरण व शुन्य कचरा प्रणालीबाबत जनजागर कार्यक्रम घेतला. ड क्षेत्रिय कार्यालयातर्फे प्रभाग क्र. २६, पिंपळे निलख येथील सोसायट्यांचे सभासद तसेच ज्येष्ठ नागरीक संघ यांच्या सहकार्याने कचरा विलगीकरण, प्लॅस्टीक मुक्ती, पाणी बचत, झाडे लावा झाडे जगवाअंतर्गत जनजागृतीपर फेरी काढण्यात आली. कचरा विलगीकरण, प्लॅस्टीक मुक्ती, पाणी बचत, पर्यावरणाबाबत प्रबोधन केले. त्यानंतर सोनिगरा केसर सोसायटीचे परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. ई क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिक व कर्मचारी यांचेकरीता प्लास्टीक बंदी, ओला-सुका कचरा विलगीकरण याबाबत प्रबोधनाचा कार्यक्रम सखुबाई गवळी उदयानात घेण्यात आला.
फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र.१ चिखली मोरे वस्ती येथील परिसरामध्ये मनपा कर्मचारी यांचे मार्फंत प्लास्टीक मुक्त अभियान राबवुन जनजागृती करण्यात आली. यावेळी व्यावसायीकांकडुन १० किलो प्लास्टीक जमा करण्यात आले. प्रभाग क्र. ११ कस्तुरी मार्केट जवळील परिसरामध्ये मनपा कर्मचारी मार्फंत प्लास्टीक मुक्त जनजागृती करुन परिसरातील व्यावसायीक यांच्याकडुन १५ किलो प्लास्टीक जमा करण्यात आले. प्रभाग क्र. १२ रुपीनगर परिसरात प्लास्टीक मुक्त जनजागृती केली. प्रभाग क्र. १३ मध्ये प्लास्टीक गोळा करुन साफसफाई केली.
ह क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक ३२ जुनी सांगवीत परिसरात नदी पात्रातील जलपर्णी काढुन विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली. या मोहिमेत सीआरपीएफचे २०० जवान पोलिस उपमहानिरीक्षक बिरेंद्र कुमार टोपो, कमांन्डेन्ट, एचएस कालस, संजीव कुमार, धिरेंद्र वर्मा, उप कमान्डेंट सचिन गायकवाड, सहा. कमान्डेंट शीजी वी. एस, संतोष भोसले, आर. सी. मीना यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी नदी पात्रातील अंदाजे ५ ट्रक जलपर्णी काढण्यात आली.