जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ निवासस्थानातून 10 हजार ड्रेस, 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 11 टीव्ही, 10 फ्रीज ताब्यात
तमिळनाडू सरकारने राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत पक्षप्रमुख जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातून 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 8 हजार 376 पुस्तकं, 38 एअर कंडीशनर आणि 10 हजार 438 ड्रेस ताब्यात घेतले आहेत.
तमिळनाडू सरकार जयललिता यांचं स्मारक तयार करणार आहे. जयललिता यांचे तमिळनाडू आणि देशभरात लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी तमिळनाडू सरकार जयललिता यांच्या स्मारकात काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवणार आहे. त्यामुळेच सरकारने जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातून काही महत्त्वपूर्ण वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. सरकार त्या सर्व वस्तू जयललिता यांच्या स्मारकात प्रदर्शनासाठी ठेवणार आहे.
तमिळनाडू सरकार जयललिता यांचं ‘वेदा निलयम’ या तीनमजली घराचं रुपांतर स्मारकात करणार आहे. जयललिता यांच्या दिवंगत आईने हे घर विकत घेतलं होतं. या स्मारकात प्रदर्शनदेखील असणार आहे. जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातील बऱ्याच वस्तू प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत.
तमिळनाडू सरकारने जयललिता यांच्या घरातून सोनं, चांदी, पुस्तकं आणि कपड्यांव्यतिरिक्त अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 11 टीव्ही, 10 रेफ्रिजरेटर, 29 मोबाईल आणि टेलिफोन, 394 स्मृतीचिन्ह, 65 सूटकेस, 108 कॉस्मेटिक वस्तू, सहा घड्याळ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन आंब्याची झाडे, पाच नारळाची आणि केळीच्या झाडांचादेखील यात समावेश आहेत.