नागपूर शहरात उद्या आणि परवा जनता कर्फ्यू
![Strict restrictions again in Sangli; Tea, paan tapari, stall closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/lockdown1-pti-1-1594004034-1594391216.jpg)
नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. नागपूरमध्ये देखील कोरोनाचा कहर वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी नागपूरमध्ये २ दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ आणि २६ जुलैला नागपुरात हा जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तसेच, २७ जुलै ते ३० जुलै या ४ दिवसांच्या कालावधीत लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन करणार आहेत.
महापौर आणि आयुक्तांनी आज लॉकडाऊनबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महापौर संदीप जोशी म्हणाले, “बैठकीत सर्व जनप्रतिनिधींचं मत आम्ही जाणून घेतले. लॉकडाऊन केला पाहिजे यासाठी कुणाचाही आग्रह नाही. पण नियम पाळले जात नाहीत. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.”या दोन दिवसांच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. किराणा, भाजी आणि डेअरी तसेच जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.
कोरानाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर कर्फ्यूसह लॉकडाऊन असं १५ दिवस ठेवावे लागेल असा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आधी दिला होता.
उद्या आणि परवाच परिस्थिती बघून भविष्यातील इतर निर्णय घेण्यात येतील असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.
“या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे. या काळात संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. लोकांनी सहकार्य करावे,” असे नागपूरचे पोलीस सहआयुक्त निलेश भरणे यांनी म्हटले आहे.
“लोकांनी आपल्या वागण्यात बदल करावा, तो केला तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असे नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय. लोकांच्या वागण्यात बदल व्हावा, तसेच आपण वागण्यात बदल केला नाही तर मोठा लॉकडाऊन लागू शकतो हे लक्षात आणून देण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे,” असे तुकाराम मुंडे यांनी म्हटले आहे.