मला विमानाने युपीला घेऊन जा, पोलीस माझा रस्त्यानं एन्काऊंटर करतील – अरविंद त्रिवेदी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/dubey.jpg)
ठाणे : मला विमानाने घेऊन जावे जर युपी पोलिसाने मला रस्ते वाहतूक मार्गे नेले तर ते माझा एन्काऊंटर करतील. अशी भिती विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदीने आज न्यायालयात केली आहे. महाराष्ट्र एटीएसने काल ठाण्यातून विकास दुबेचा उजवा हात अरविंद त्रिवेदीला अटक केली होती. त्यानुसार त्यांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. युपी पोलिसांनी यमसदनी धाडलेल्या विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद त्रिवेदी हा भाजीच्या गाडीत बसून ठाण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे विकास आणि अरविंद दोघे एकत्रित उज्जैनला पळाले होते.
मात्र त्यानंतर अरविंदने आपला वेगळा मार्ग निवडत मिळेल त्या गाडीने उलट सुलट प्रवास करत ठाण्याला पोहोचला होता. उज्जैन ते राजस्थान, राजस्थानहून पुण्याला, पुण्याहून नाशिकला आणि शेवटी भाजीच्या ट्रक मधुन गुंड अरविंद त्रिवेदी नाशिकहून ठाण्याला आपल्या नातेवाईकांकडे आला होता. ठाण्याच्या कोलशेत येथे जाधववाडीत अरविंद त्रिवेदीचे नातेवाईक राहत होते त्यांच्याकडे तो आला होता. पण, अरविंद इथे येताच काही तासात त्याची माहिती एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळाली आणि त्यांनी सापळा रचून अरविंदला त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारीसह अटक केली.
ठाण्याहून देखील अरविंद तिवारी पळण्याच्या तयारीत होता मात्र त्याआधीच एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांनी त्याला अटक केली. आज अरविंद त्रिवेदी आणि सोनू तिवारी यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता, उत्तरप्रदेश पोलिस या दोघांनीही ताब्यात घेण्याकरीता रवाना झाली असून तत्पुर्वी या दोघांची ठाणे न्यायालयाने २१ जुलैपर्यंत तळोजा जेलमध्ये रवानगी केली आहे. उत्तरप्रदेश पोलिस येताच या दोघांना त्यांच्या हवाली केले जाईल याआधी त्यांची कोविड तपासणी केली जाणार आहे.