कोरोना : काय कमावलं काय गमावलं…!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/1-14.jpg)
‘स्टॅच्यू’ दिल्याप्रमाणे सगळं जग अचानक थांबलं, अदरवाइज हे शक्य होते का? पण कोरोनाने हे करुन दाखले जगाला थांबायला भाग पाडले.
लेखिका : सौ. अनिता घाडगे {9552472636}
सगळेजण वेड्यासारखे धावत होते, जिवाचा आटापीटा करत होते. पडत होते, थकत होते, पण धावायचे काही थांबत नव्हते. प्रत्येकाने स्वत:साठी स्वत:च्या प्रगतीसाठी, नावलौकीक कमावण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, यश मिळवण्यासाठी कुठल्यातरी ध्यासापोटी, ध्येयापोटी नक्कीच धावावे आणि प्रयत्नशील रहावे. कौतुकास्पद आहे ते! पण किती???
शेवटी थांबावेच लागेल. इच्छा नसताना… आणि मग हळूहळू स्वत:ला स्वत:चाच शोध लागला. अरेच्या हेच तर शोधत होतो मी!
निवांतपणा, मोकळेपणा, स्वत:साठी आणि कुटुंबीयांसाठी मिळालेला Quality time क्वालीटी टाईम व्यक्तीमत्त्वाने कुटुंबातल्या सर्व सदस्यांची नव्याने झालेली ओळख, प्रदुषणविरहीत हवा, टारगेट्स (टार्गेटस) नाहीत, हेडलाईन्स नाहीत, कुठलीही स्पर्धा नाही. फक्त स्वत:ची, कुटुंबाची, खासकरुन सर्वांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी घेणे, जबाबदारीने वागणे, दिवसभारात गृहणींनी बनवलेल्या नवनवीन, स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे, एवढेच काय ते काम लॉकडाउनमध्ये ठरले होते. या गोष्टींमुळे मन आणि तब्बेत खूष झाली नसेल, तर नवलच!! आणि मग काय, अशा ‘दिलखूश’ वातावरणात अनेक छंद जे सुप्तस्थितीत अडगळीत पडून होते ते आपसुकच बाहेर निघाले. काही ठिकाणी धुळखात पडलेले हार्मोनिअम, सिंथेसायझर, तबला, बासरी ई. आपसुकच बाहेर आले. त्याचबरोबर मनातील कविता, कथा, ललीत लेख कागदावर उतरु लागले. जुने, नवे, बघायचे राहूल गेलेले चित्रपट, वेबसेरीज, मालिका बघण्यास वेळ मिळू लागला. रामायण, महाभारत नवीन पीढीला बघता आले. फिटनेसप्रेमी स्वत:च्या फिटनेसकडे जास्तीत जास्त लक्ष देवून इतरांसाठीही काही पोस्ट टाकू लागले. कोरोना संदर्भात घ्यायची काळजी, घरगुती उपाय, काढे, औषधे, व्यायाम अशा एक ना अनेक गोष्टी सोशल मीडियावर फिरु लागल्या. काही गोष्टींचा अतिरेक झाला.
महिलावर्गाचा उत्साह मात्र या काळात वरच्या पट्टीतला…काय काय नवनवीन पदाथ्र करुन बघत होत्या. ‘न भुतो न भविष्यती’ अशा प्रकारे इतके नाविण्यपूर्ण पदार्थ या काळात केले गेले की जणुकाही स्पर्धाच लागली होती. व्हॉट्सॲपचे स्टेटस बघून तर असे वाटायचे की आता हॉटेल उघउण्याचे धाडस करणार नाहीत, इतकी विविधता आणि सुगरणपणा…
असो, सांगायचा मुद्दा असा की काय काय अनुभवले आणि कमावले आपण या काळात
सरकारने किंवा कोरोनाने असा लॉकडाउन जाहीर केला नसता, तर असा लॉकडाउन आपण स्वत:साठी लावला असता का हो??
पण, असा लॉकडाउन प्रत्येकातील स्वत:ला नितांत गरजेचा आहे. तो किती काळ घ्यायचा, किती काळानंतर लावून घ्यायचा ह्या बाबत ज्याची त्याची गणिते आणि समिकरणे वेगळी असतीलही. पण ‘लॉकडाउन’ पाहिजेच…
कोरोना ही जागतिक महामारीच म्हणावी लागेल. ज्याचा अनुभव सर्वांसाठीच नवीन होता. अनेकांनी आपले प्राण गमावले, भितीमुळे अनेकांचे मनोबल खचले, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, अनेक भूकबळी गेले, अनेकांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येचे सत्र तर अजुनही चालूच आहे. अर्थात कोरोनाही हद्दपार झालेला नाही. अनेक संकटे आपल्यासमोर येणार आहेत. आर्थिक महामंदीला सामोरे जावे लागणार आहे.
यानिमित्ताने व्यवस्थापनातीलही अनेक त्रुटी समोर आल्या. परप्रांतीय मजुरांची घरी जाण्यासाठी धडपड, त्यांची ससेहोलपट बघून मन विषन्न झाले. असे वाटके, कुठे गेले होते ते बडे नेते? जे मत मागण्यासाठी घरोघरी, गावोगावी, खेडोपाडी दौरा करतात. सगळेच कसे गप्प आणि पाषाणहृदयी…
हळुहळू सगळं पूर्वपदावर येते आहे. गरज आहे ती स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची, काय कमावले आणि काय गमावले याचा लेखाजोखा मांडून, स्वत:मध्ये बदल करुन स्वत:चेच मनोबल उंचावण्याची…कोरोनासहीत जगताना कोरोनाशीच दोन हात करण्याची…
सुरक्षीत रहा, सतर्क रहा!!