२१ जुलैपासून ५ वीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार – बच्चू कडू
मुंबई | राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरु होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करुन शिक्षण सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी १०वी, १२वीचे वर्ग ५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
दरम्यान, पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आहे. तर सक्तीने शुल्क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या परिस्थितीत शिक्षण सुरु करण्यासंदर्भात अमरावती येथे काल (९ जुलै) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरु होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरु करण्याचे नियोजन करावे.