पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका : एका दिवसांत 760 जणांवर कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/1-7.jpg)
पिंपरी । पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि.०८) ७६० जणांवर कारवाई केली. शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने पोलीसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा सहावा टप्पा बुधवार (दि. ०१ जुलै) पासून सुरु झाला आहे. हा टप्पा ३१ जुलैपर्यंत राहणार आहे. लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काही प्रमाणात सूट दिली जात आहे. सार्वजनिक वाहतूक देखील काही प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. अन्य अनेक अस्थापना सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वावर वाढला आहे. कोरोना विषाणूचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच प्रशासनाकडून दिली जाणारी सूट त्यासाठी पोषक ठरत आहे. पोलिसांकडून देखील कारवाईचा वेग मंदावला होता. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यात दररोज २०० ते ३०० लोकांवर कारवाई केली जात होती. तोच आकडा आज ७६० वर येऊन पोहोचला आहे.
बुधवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (८९), भोसरी (२७), पिंपरी (५३), चिंचवड (४६), निगडी (४५), आळंदी (१५), चाकण (२५), दिघी (४७), म्हाळुंगे चौकी (२८), सांगवी (५०), वाकड (५२), हिंजवडी (६४), देहूरोड (३४), तळेगाव दाभाडे (३१), तळेगाव एमआयडीसी (१६), चिखली (११५), रावेत चौकी (२०), शिरगाव चौकी (१२) अशी एकूण ७६० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.