‘बाप्पा’ ची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांवरच विघ्न…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/murti2_051520121658.jpg)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव कशापद्धतीने साजरा करायचा हा सर्वांनाच प्रश्न होता ..मात्र सरकारनं काही नियम व अटींसह गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याची परवानगी दिलेली आहे…
तसेच मुंबईतील अनेक मोठ्या गणेश मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचंही जाहीर केलं आहे. मात्र, यामुळे अनेक गणेश मूर्तीकारांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. गणेश चित्रशाळांमध्ये काम करणारे कामगार आपल्या गावी गेले आहेत. मुंबईत पुन्हा यायला ते घाबरत आहेत. दरवर्षी प्रत्येक मुर्तीकार जवळपास १२०० गणेशमूर्ती घडवतो. मात्र, यंदा फक्त ७०० गणेशमूर्तीच घडवता येणार आहे.
राज्य सरकारने मुर्तीकारांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करा, असे सांगण्यात आलं आहे. मात्र, मूर्ती तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणे मंडप उभारण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. आपल्या घरीच गणेशमूर्ती तयार करा, असंही सरकारचं म्हणणं आहे. मात्र, घरे तेवढी मोठी नसल्यानं. आणि वाहतुकीवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कच्च्या मालाचाही तुटवडा जाणवत असल्याची प्रतिक्रिया गणेश मूर्तीकारांनी दिली आहे…तसेच मुर्ती बनवण्यासाठी मंडप उभारण्यासही सरकारनं परवानगी दिली नसल्यानं मुर्तीकारांपुढे मुर्ती घडवायच्या कशा आणि कुठे हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे…