‘व्हीव्हीआयपी’ गेस्ट हाउस ‘कोविड योद्धयांना’ दिले; उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/3-11.jpg)
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुण्यातील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस प्रशासनाने परस्पर कोरोनावर उपचार करणार्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना दिले आहे. मात्र, यावरुन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
मात्र, सरकारी मालमत्ता कोविड योद्धांसाठी वापरली, तर त्यात गैर काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून व्हीव्हीआयपी लोकांच्या सोयीसाठी भव्यदिव्य आणि आकर्षक असे अभ्यागत कक्ष बांधले आहे. या कामी अजित पवार यांचाच पुढाकार आहे. या गेस्ट हाऊसमध्ये फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उप सचिव दर्जाच्या वरील अधिकार्यांनाच प्रवेश आहे. या गेस्ट हाऊसमध्ये आधुनिक सोयींसह गच्चीवर हेलिपॅडदेखील आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सत्तर कोटी रुपये खर्च करून फाईव्हस्टार दर्जाचे शोभावे, असे हे गेस्ट हाऊस उभारले आहे. कार्यकारी अभियंता जातीने लक्ष देऊन यातील सर्व कक्षांची अत्यंत बारकाईने दररोज साफसफाई आणि मेंटेनन्स करतात. याठिकाणी अन्य खासदार, आमदारांनादेखील प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सामान्य माणसाने प्रवेश करणे दूरच; मात्र आता अधिकार्यांनी हीच ग्रीन बिल्डिंग आणि व्हीव्हीआयपी सर्किटहाऊसमधील वीस खोल्या ससून येथे कार्यरत असणार्या कोविड ड्यूटीवरील डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचार्यांना दिल्या आहेत.
दरम्यान, अजित पवार एका बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्यांना ही बातमी कळताच ते जाम संतापले. बैठकीतून त्यांनी आपला मोर्चा तत्काळ अधिकार्यांच्याकडे वळविला. त्या ठिकाणी त्यांनी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याचे अधिकार्यांना सुनावले. मनमानी न करता या कर्मचार्यांना, डॉक्टरांना हॉटेलमध्ये ठेवायचे होते. आपण गेस्टहाऊसमध्ये त्यांना कसे ठेवले, असा सवाल करीत त्यांनी दोन दिवसांत हे गेस्टहाऊस खाली करण्याचा आदेश दिला.
कोविड योद्धयांचा हिरमोड…
हे व्हीव्हीआयपी गेस्टहाऊस ज्यांनी आजवर कधी पाहिलेले नव्हते, अशा सरकारी कर्मचार्यांना ते दिल्याने खूश झाले होते. अलिशान इमारत, अद्ययावत फर्निचर, चवदार स्वयंपाक करणारे खानसामा पाहून ही मंडळी हुरळून गेली. काय झकास व्यवस्था केली तुम्ही, अशा कमेंटही या कोविड कर्मचार्यांकडून मिळाल्या. दिवस-रात्र रुग्णालयात राबणार्या डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचार्यांना या गेस्टहाऊसमुळे दोन क्षण सुखाचे मिळाले होते, अशी त्यांची भावना होती. तो आनंद काही क्षणात हिरावला जाणार आहे. या भावनेने मुक्काम करणारे कर्मचारी मात्र हिरमुसले आहेत.