पिंपरी- चिंचवड महापालिकेत कोरोनाचा शिरकाव; ३० जूनपर्यंत नागरिक, ठेकेदारांना ‘प्रवेश बंदी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/pimpri-chinchwad-759.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिक, ठेकेदार यांना आज (दि.२०) पासून ३० जून पर्यंत महापालिकेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
या प्रवेशबंदीचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज काढला आहे. नागरिकांनी महापालिकेशी संबंधित कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सॲपचा वापर करावा. ते ग्राह्य धरुन प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. लॉकडाउनमध्ये नागरिकांना दोन महिने महापालिकेत प्रवेशबंद होता. परंतु, शिथिलतेनंतर महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना २७ मे पासून दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवेश दिला जात होता. महापालिका मुख्यालयात अपरिहार्य परिस्थितीत कार्यालयात येणे आवश्यक असल्यास विभागातील अधिका-यांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन १३ जूनपासून दुपारी ४ ते ६ या वेळेमध्येच प्रवेश दिला जात होता.
परंतु, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाने महापालिका मुख्यालयात देखील शिरकाव केला आहे. नगरसेविका, उपअभियंता, कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचा-यांना संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता करसंकलन विभागीय कार्यालये व प्रभाग कार्यालयातील कर भरणा विषयक कामकाज वगळता ३० जून पर्यंत महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्रवेशबंद असणार आहे. नागरिक, ठेकेदारांसह इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार लॉकडाउनच्या अनुषंगाने शासकीय कामकाजासाठी ई-मेल, व्हॉट्सॲपचा वापर ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार नागरिक, ठेकेदारांनी महापालिका सेवेशी संबंधिक कामकाजाकरिता दूरध्वनी, भ्रमणध्वनी, ई-मेल, व्हॉट्सॲपचा वापर करावा. या माध्यमांद्वारे प्राप्त अर्ज, निवेदने, तक्रारींबाबत संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करुन त्याच माध्यमांद्वारे संबंधितास कळविण्यात यावे, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.