हाफिज सईदची संघटना निवडणूक लढवण्यावर ठाम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Hafiz-Saeed_.jpg)
- दुसऱ्या पक्षाच्या आधाराने उतरणार रिंगणात
लाहोर – मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सूत्रधार हाफिज सईद याच्या नेतृत्वाखालील जमात-उद्-दावा (जेयूडी) ही संघटना पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. जेडीयूने अल्ला-उ-अकबर तेहरिक (एएटी) या दुसऱ्याच पक्षाच्या आधाराने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ती निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने जेयूडीने मिली मुस्लिम लिग पक्षाची स्थापना केली. मात्र, त्या पक्षाला पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जेयूडीने आता एएटीच्या नावाखाली निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. एहसान नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने एएटीची स्थापना केली आहे. मात्र, तो पक्ष तसा निष्क्रीयच आहे. खुर्ची हे त्या पक्षाचे चिन्ह आहे. त्या चिन्हावर आता हाफिजचे समर्थक निवडणूूक रिंगणात उतरतील.
दरम्यान, हाफिज हा लष्कर-ए-तोयबा या खतरनाक दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. तोयबानेच मुंबईतील महाभयंकर दहशतवादी हल्ले घडवले होते. मात्र, स्वत:ला देशभक्त म्हणवत हाफिज पाकिस्तानात उजळ माथ्याने वावरतो. समाजकार्याचे ढोंग करण्यासाठी त्याने जेयूडीची स्थापना केली आहे. अमेरिकेने जून 2014 मध्येच जेयूडीला परकी दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. एवढेच नव्हे तर, हाफिजसाठी तब्बल 1 कोटी अमेरिकी डॉलर्सचे इनामही जाहीर करण्यात आले आहे.