साताऱ्यात सशस्त्र टोळक्याचा भररस्त्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/images-37.jpeg)
सातारा शहरात खेड नाका ते बाँम्बे रेस्टॉरंट चौकादरम्यान एका टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावर गोंधळ घालत गाड्यांची तोडफोड करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. भर दुपारी रस्त्यात दुचाकी व मोटार चालकांना कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
पुणे-बंगळूरू महामार्गालगत असणाऱ्या खेडनाका ते बाँम्बे रेस्तराँ चौकादरम्यानच्या परिसरात काही तरुणांच्या टोळक्याने शुक्रवारी धुडगूस घातला. हातात कोयते नाचवत दोन दुचाकी व मोटारी अडवत पैशांची मागणी करीत त्यांनी तोडफोड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुपारी ४-५ च्या दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हा परिसर रहदारीचा व नवीन वसाहतींचा असल्याने वाहन चालक व नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा होती. ही बाब सातारा शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधितांबाबत स्थानिकांकडून माहिती घेत गोंधळ करणाऱ्यांची शोध मोहीम चालू केली. दरम्यान, नागरिकांनी परिसरात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी केली होती.