सलाम कर्तुत्वाला! चिमुरडीसाठी एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दुधाची पिशवी घेऊन धावला RPF कॉन्स्टेबल, अन् त्यानंतर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Bhpal-RPF-Constable-Inder-Yadav.jpg)
एका लहान मुलीला दूध मिळावं यासाठी धावत्या ट्रेनच्या मागे धावणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. भोपाळमधील हा पोलीस कर्मचारी सध्या चर्चेचा विषय ठरत असून भारतीय रेल्वेने तर त्यांना पोस्टर बॉय करुन टाकलं आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट केलं असून रेल्वे पोलीस दलाचे कॉन्स्टेबल इंदर यादव यांची तुलना थेट उसेन बोल्टशी केली आहे.
एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दूध घेऊन धावणारा उसेन बोल्ट असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एक हाथ में राइफल और एक हाथ में दूध : देखिये किस तरह भारतीय रेलवे ने उसैन बोल्ट को पछाड़ा
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 5, 2020
Rifle in one hand and milk in another – How Indian Railways left Usain Bolt behind pic.twitter.com/oGKSEe9awJ
शफिया हाशमी यांची चार वर्षांची मुलगी भुकेली होती. कर्नाटकहून उत्तर प्रदेशच्या गोरखपूरला निघालेल्या श्रमिक ट्रेनमधून त्या प्रवास करत होत्या. ट्रेन भोपाळमध्ये काही मिनिटांसाठी थांबली असता शफिया यांनी इंदर यादव याच्याकडे मदत मागितली. मुलासाठी आपण दुधाची व्यवस्था करु शकत नसून, बिस्कीट पाण्यात बुडवून तिला भरवत आहोत असं गा-हाणं तिने इंदर यांच्यासमोर मांडलं.
पण इंदर यादव यांनी दुधाची व्यवस्था करण्याआधीच ट्रेन स्थानकावरुन सुटली. आपल्याला उशीर झाला असल्याचं लक्षात येताच इंदर यादव यांनी डब्याच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात दुधाची पिशवी घेऊन ते वेगाने धावत सुटले. विशेष म्हणजे शफिया यांच्यापर्यंत ते पोहचले आणि दूधाची पिशवी सोपवली.
ही सर्व घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स यादव यांच्या माणुसकीचं कौतुक करत आहेत. रेल्वेमंत्र्यांनी तर बक्षिसही जाहीर केलं आहे.