फ्लॅट विक्री फसवणूक : सोलापूरमधील उपहापौराला सांगवी पोलिसांनी ‘या’कारणास्तव सोडले!
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करीत फसवणूक प्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्याच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने पुन्हा हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून देण्यात आले. ही घटना आज (दि.३०) सांगवी येथे शनिवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश दिलीप काळे (वय ४२, रा. सोलापूर) असे सांगवी पोलिसांनी सोलापूरहून ताब्यात घेतलेल्या उपमहापौराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काळे याने सन २००२ मध्ये पिंपळे निलख येथील औदुंबर सोसायटीत एक फ्लॅट घेतला होता. बनावट कागदपत्रे तयार करून त्याने हा फ्लॅट अनेकांना विकला होता. याप्रकरणी २०१९ मध्ये सांगवी पोलिस ठाण्यात आणि २००७ मध्ये निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात काळे यांना ताब्यात घेण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्यातील एक पथक सोलापूरला रवाना झाले होते. आरोपीला घेऊन हे पथक शहरात दाखल झाले. शनिवारी दुपारी पुरावे गोळा करण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरू होती. दरम्यान सांगवी पोलीस उपमहापौर काळे यांची चौकशी करीत असताना त्यांना सतत शिंका येत होत्या. तसेच त्यांना तापाची लक्षण जाणवत होती. पुढील धोका टाळण्यासाठी आम्ही त्यास पुन्हा हजर राहण्याची नोटीस देऊन उपचाराकरिता सोडून दिले असे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.