#Lockdown:रेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/railway-2.jpg)
नवी दिल्ली : जवळपास दोन महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा आता येत्या काळात पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे.
श्रमिक स्पेशल रेल्वे म्हणू नका किंवा मग देशातील विविध भागांमध्ये असणाऱ्या नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठीच्या रेल्वे गाड्यांची तरतूद म्हणू नका. टप्प्याटप्प्यानं पावलं उचलत भारतीय रेल्वे खऱ्या अर्थानं रुळावर येऊ लागली आहे.
सध्याच्या घडीला यातच पुढचं पाऊल म्हणजे रेल्वे मंत्रालयायकडून आरक्षण प्रणालीत करण्यात आलेले काही महत्त्वाचे बदल. १ जूनपासून रेल्वे मंत्रालयाकडून हे नवे नियम लागू करण्यात येणार असून, आरक्षित तिकिटांनीच प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी १२० दिवस आधी आगाऊ प्रवासी आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. यापूर्वी २२ मे पासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.