भाजपकडून राज्यपालांची भेट घेण्याचं सत्र सुरूचं ! आमदार ,खासदारांची घेतली राज्यपालांची भेट
मुंबई | सध्याची राज्यातील कोरोना स्थिती हाताळण्यात महाविकासआघाडी सरकारअपयशी ठरल्याची तक्रार करण्यासाठी आजसुद्धा भाजपच्या काही नेत्यांनी राजभवनावर हजेरी लावली. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल यांनी आज राजभवनावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
महाविकासआघाडी सरकार अस्थिर करणे किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी नाही, असे देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे. तरीही राज्यपालांकडे तक्रारीसाठी रोजचा कार्यक्रम कायम ठेवून भाजपने सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न कायम ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने उग्ररूप धारण केलं असताना देशाच्या कोरोना रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली असताना, राज्य सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतलेले दिसत नाहीत.





