#CoronaVirus: …तर महाराष्ट्रानं भाजपाची पाठ थोपटली असती; भाजपाच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले
!["Devendra Fadnavis should be a bigger leader than Modi, that's why," said Sanjay Raut.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Sanjay-Raut-Devendra-Fadanvis.jpg)
राज्य सरकारच्या कामाबद्दल भाजपानं राज्यभर आंदोलन केलं. या आंदोलनावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. “राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत भाजपानं राज्य सरकारचे आणि महाराष्ट्राचे हात बळकट करण्याची गरज आहे. आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवल्यानंतर भाजपानं काळ्या पट्ट्या, काळ्या हाफ चड्ड्या घालून आंदोलन केलं, असतं तर जनतेनं त्यांची पाठ थोपटली असती,” अशा शब्दात राऊत यांनी भाजपाच्या आंदोलनाचा समाचार घेतला.
करोनामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी भाजपानं आज (२२ मे) माझं अंगण रणांगण आंदोलन केलं. भाजपाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचा संजय राऊत यांनी समाचार घेतला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला जर आंदोलन करायचंच होतं, तर मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जेव्हा गुजरातला नेण्याचा आदेश झाला, १ मे रोजी तेव्हा जर त्यांनी अशा प्रकारे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्या पट्ट्या, काळ्या रिबीन बांधल्या असत्या, काळ्या हाफ चड्ड्या, बनियान घातल्या असत्या, तर कदाचित महाराष्ट्रानं त्यांची पाठ थोपटली असती. पण, सरकारचे आणि राज्याचे हात बळकट करण्याची गरज असताना आंदोलन केलं जात आहे. हा एक प्रकारचा जळफळाट आणि पोटदुखी आहे. आंदोलन तुम्ही करू शकता, पण ही वेळ नाही,” अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर शाब्दिक बाण सोडले.