चिंचवडगावातील भाजी विक्री केंद्रात कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना हरताळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/91812545_3018009991599630_7871247818755670016_o.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी भाजीविक्रीची सोय केली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेचा मूळ उद्देशच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शहरातील नागरिकांनी ते राहत असणाऱ्या ठिकाणी गर्दी करू नये, कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे, यासाठी शहरातील निरनिराळ्या ठिकाणी एकाच छताखाली फळे, भाजीपाला विक्रीकेंद्राची उभारणी केली. परंतु, या उद्देशाला काही ठिकाणं छेद मिळत असल्याच्या घटना घडत आहेत. असाच प्रकार महापालिकेच्या चिंचवडगावातील भाजी विक्री केंद्रावर घडताना दिसून येत आहे. याबाबत पिंपरी चिंचवड शहर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात डांगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने फळे, भाजीपाला विक्रीसाठी केशवनगरमधील तालेराचे मोकळे पटांगण विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून दिले. मुळात भाजीपाला विक्रीकेंद्र हे नागरिक रहात असणाऱ्या परिसरापासून दूरच्या अंतरावर आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक महापालिकेच्या भाजी विक्रीकेंद्राकडे न जाता, भाजी खरेदीसाठी रस्त्यावर येतात. सुरक्षाअभावी जुन्या मंडईच्या आजुबाजुला व संपूर्ण चिंचवडगाव परिसरात हातगाडीवाले व पथारीवाले जागोजागी भाजी विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. शहरातील गोरगरीब भाजीविक्रेते आपला जीव धोक्यात घालून, केवळ लोकांची सेवा व्हावी, या भावनेने महापालिकेच्या केंद्रावर भाजीपाला विक्री करून, लॉकडाऊन काळात आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु ग्राहक या केंद्राकडे फिरकत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. आतातर या केंद्रावर नागरिकांची नोंदणी, सॅनिटाईजर कक्षही बंद करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने हे केंद्र बंद करून, चिंचवडगावातील जुनी भाजी मंडई विक्रेत्यांसाठी खुली करावी. मंडईतील भाजी विक्रेते शासनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, स्वतःच्या व ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेतील. मुळात या विक्रेत्यांची देखील हीच मागणी आहे. महापालिकेने सुरु केलेले भाजी मंडई केंद्र केवळ दिखावा म्हणून शिल्लक आहे. या केंद्रावर ग्राहकाच फिरकत नसल्यामुळे या विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. उलट कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे भाजी विकणारे हातगाडीधारक व पथारीवाले यांची चंगळ होत आहे. सर्वप्रथम महापालिकेने या अनधिकृत हातगाडीवाले व पथारीवाले यांच्यावर कारवाई करावी व चिंचवडगावातील जुनी भाजी मंडई पूर्वरत सुरु करावी, असे या निवेदनात डांगे यांनी म्हटले आहे.