साताऱ्यात आणखी 20 कोरोनाबाधित वाढले, एकूण रुग्णसंख्या 166
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-virus-2-3-1.jpg)
सातारा | सातारा जिल्ह्यात मंगळवारी आणखी 20 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामध्ये कराड तालुक्यातील सहा, पाटण तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील दोन, खंडाळा तालुक्यातील एक, जावळी तालुक्यातील एक, सातारा तालुक्यातील पाच, वाई तालुक्यातील एक, अशा रुग्णांचा समावेश आहे. त्या आधी मंगळवारी सकाळी आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल 28 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा 20 जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये सातारा तालुक्यातील वर्णे येथील एक पुरुष, वारणानगर (लांडेवाडी) येथील तीन महिलांचा समावेश आहे. खंडाळा तालुक्यातही आणखी एका बाधिताची भर पडली आहे. मुंबईत रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही एक महिला आश्चर्यकारकरित्या अजनुज येथे आली होती. तिच्यासमवेत आलेल्या एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वाई तालुक्यातही आता करोनाचा शिरकाव झाला आहे. कवठे येथील एक जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा रुग्ण पनवेल येथून आल्याचे समजते. कोरेगाव तालुक्यात वेळू व न्हावी बुद्रुक येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्यातील डिस्कळ येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे एक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मायणीतदेखील आणखी एका बाधिताची भर पडली आहे. कोरोनामुक्तीचा पॅटर्न ठरू पाहणाऱ्या जावळी तालुक्यातील वरोशी येथे एक बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे शतक मंगळवारी सकाळी ओलांडणाऱ्या कराड तालुक्याला रात्री पुन्हा हादरा बसला आहे. तालुक्यातील नवा हॉटस्पॉट ठरलेल्या म्हासोलीत आणखी चार रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर शामगाव येथेही ठाण्यातून आलेला एक जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण ठाण्यातील कोव्हिड रुग्णाचा निकट सहवासीत होता. चरेगावजवळील खालकरवाडी येथेही एक बाधित रुग्ण आढळला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथून पाटण तालुक्यातील कोयना भागातील शिरळ येथे आलेल्या एकाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.