#CoronaVirus | टाटा ट्रस्टकडून राज्यात करोना रुग्णालये
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/03/Ratan-Tata-l-pti.jpg)
मुंबई | टाटा ट्रस्टतर्फे राज्यात सांगली आणि बुलढाणा येथील दोन सरकारी रुग्णालयांच्या इमारतींमध्ये सुधारणा करून त्याठिकाणी कोविड-१९ उपचार केंद्रे विकसित करण्यात येत आहेत. या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणारे रुग्ण आणि बाह्य रुग्ण यांना देण्यात येणाऱ्या उपचार सुविधा केवळ करोनादरम्यान नाहीतर कायमस्वरूपी मिळतील.
अलीकडेच रतन एन टाटा यांनी, ‘आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे,’असे निवेदन जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात सांगली (५० बेड्स) आणि बुलढाणा (१०६ बेड्स) येथे ही रुग्णालये उभारली जाणार आहेत. प्रत्येक रुग्णालयामध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या सेवा, छोटी ऑपरेशन थिएटर, सामान्य पॅथॉलॉजी, रेडिओलॉजी, डायलिसिस सुविधा, रक्त साठवणी सुविधा आणि टेलिमेडिसिन युनिट अशा क्षमता उपलब्ध होतील. या रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी टाटा ट्रस्ट कर्करोग उपचार सुविधा निर्माण करण्यातील आपल्या अनुभवांचा वापर करत आहे. तसेच सेवा पुरवठादारांनाही या कामासाठी जोडण्यात आले आहे. या रुग्णालयांचे बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड करत असून डिझाइन एडिफीस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडने तयार केले आहे. सर्व उपकरणे आघाडीच्या उत्पादकांकडून घेतली जात आहेत.