#Coronalockdown:क्वारंटाईन केलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/death_5539402_835x547-m.jpeg)
यवतमाळ : क्वारंटाईन करण्यात आलेल्या तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली आहे. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत अहमदनगरवरुन आलेल्या तरुणाला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या भीतीने गावातील ग्रामस्थ जवळ येत नसल्याने या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.
रामा विठ्ठल आत्राम असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे रामा विठ्ठल आत्राम, हनुमान अय्याजी आत्राम (वय 20) आणि सुरेश अरुण आत्राम (वय 21) हे तिघे अहमदनगर येथील खाजगी कंपनीत कामाला होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने हे तिघेही नगर येथे अडकून पडले.
मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली. त्यानंतर हे तिघेही बसने यवतमाळ आणि यवतमाळवरुन मारेगाव येथे कसेबसे पोहोचले. तिथे तालुका प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करुन गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केलं.
गावात क्वांरटाईन करण्यात आलेले गावातील नागरिक आणि कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने जवळ येत नव्हते. मात्र, त्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत होत्या. दोन दिवस एकांतवासात दिवस काढल्यावर मात्र रामा विठ्ठल आत्राम याचा संयम सुटला.